महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचा उगम आणि विकास

in Module
Published on:

अनया थत्ते (Anaya Thatte)

डाॅ. अनया थत्ते, एक यशस्वी संगीतज्ञ, गायिका आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या माजी विभागप्रमुख आहेत. त्यांना संगीत अध्यापनाचा एकूण एकोणीस वर्षांचा दीर्घ अनुभव असून त्यांनी संगीतात संशोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. अॅम्स्टरडॅम विद्यापीठाद्वारे त्यांना उदयोन्मुख संगीतशास्त्रज्ञ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगीतातील संशोधनासाठी त्यांना एशियाटिक सोसायटी मुंबईची फेलोशिप प्राप्त झाली असून अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणारया भारतीय उच्च अध्ययन संस्थान, सिमला ची यूजीसी-आयसीयू असोसिएटशिप प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी संगीतातील संशोधन पध्दती आणि नवरागनिर्मितीची तत्वे या दोन पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्या गुजराती सुगम संगीतासाठी आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार असून संगीतात एम.ए., संगीत अलंकार, नेट, आणि एल.एल.बी. आहेत. भातखंडे संगीत संस्थान समविश्वविद्यालय, लखनौ, चिन्मय विश्वविद्यालय कोलवण, पुणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, आदि विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाच्या त्या सदस्य असून त्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस चे अभ्यासक्रम बनविले आहेत.

महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेचे स्थान सर्वोच्च आहे. महाराष्ट्राला अत्यंत समृध्द कीर्तन परंपरा लाभलेली आहे. ही कीर्तन परंपरा पूर्णपणे सांगितिक असून भारतात अस्तित्त्वात असलेल्या अन्य कीर्तन परंपरांपेक्षा प्राचीन आहे. कीर्तनात कीर्तनकार आपल्या इष्टदेवतेच्या सगुण रूपाचे वर्णन संगीताच्या माध्यमातून करतो. नवविध भक्तीतील कीर्तन हा दुसरा भक्तिप्रकार आहे. 
कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य, नैतिक आचरण यावर उपदेशात्मक विवेचनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून त्यांचे मानवी जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे यावर भाष्यही करतो.एकूणच काय कीर्तनकार हा धर्म आणि संगीत यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करतो.