महाराष्ट्राची कीर्तन परंपराए, उगम आणि विकास

in Overview
Published on: 10 February 2020

अनया थत्ते (Anaya Thatte)

डाॅ.अनया थत्ते, एक यशस्वी संगीतज्ञ, गायिका आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या माजी विभागप्रमुख आहेत. त्यांना संगीत अध्यापनाचा एकूण एकोणीस वर्षांचा दीर्घ अनुभव असून त्यांनी संगीतात संशोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. अॅम्स्टरडॅम विद्यापीठाद्वारे त्यांना उदयोन्मुख संगीतशास्त्रज्ञ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगीतातील संशोधनासाठी त्यांना एशियाटिक सोसायटी मुंबईची फेलोशिप प्राप्त झाली असून अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणारया भारतीय उच्च अध्ययन संस्थान, सिमला ची यूजीसी-आयसीयू असोसिएटशिप प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी संगीतातील संशोधन पध्दती आणि नवरागनिर्मितीची तत्वे या दोन पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्या गुजराती सुगम संगीतासाठी आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार असून संगीतात एम.ए., संगीत अलंकार, नेट, आणि एल.एल.बी. आहेत. भातखंडे संगीत संस्थान समविश्वविद्यालय, लखनौ, चिन्मय विश्वविद्यालय कोलवण, पुणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, आदि विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाच्या त्या सदस्य असून त्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस चे अभ्यासक्रम बनविले आहेत.

महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. ही परंपरा पूर्णपणे सांगितिक आहे. ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते. त्यावेळी त्याला नामसंकीर्तन असे म्हणतात आणि ज्यावेळी ही भक्ति केवळ गद्यरूपात शब्दांद्वारे व्यक्त केली जाते, त्यावेळी त्याला कथा असे संबोधिले जाते. अर्थात, साहित्य, वक्तृत्व, अभिनय, भाषा, आणि संगीताचा समावेश ज्यात आहे ते कीर्तन होय. कीर्तनात कीर्तनकार आपल्या इष्टदेवतेच्या सगुण रूपाचे वर्णन संगीताच्या माध्यमातून करतो‐ नवविध भक्तीतील कीर्तन हा दुसरा भक्तिप्रकार आहे.

कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो.
प्रस्तुत लेख महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचा उगम आणि विकास यावर भाष्य करणारा अभ्यासपूर्ण लेख आहे.

 

काही महत्वाच्या व्याख्या 

1) कीर्तन:- ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते, त्यावेळी त्याला नामसंकीर्तन असे म्हणतात.
2) उपास्य दैवत:- कीर्तनाच्या निरनिराळया संप्रदायांमध्ये ज्या प्रमुख दैवतांची उपासना केली जाते, त्या देवता म्हणजे उपास्य दैवत होय.
3) स्ंप्रदाय:- एक असा जनसमूह, जो एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या आधारे आपली जीवनचर्या निश्चित करतो, आणि त्याआधारेच आपले दैनंदिन जीवनातील खान पान आणि राहणीमान कशाप्रकारे असावे हे निश्चित करतो, ज्यायोगे त्यातील प्रत्येक सदस्य आपले पारमार्थिक कल्याण साधू शकेल.
 4) नारदीय संप्रदाय:- कीर्तनाची सुरूवात महर्षी नारदांपासून झाली असे मानतात‐ हीच परंपरा पुढे चालू राहिली आणि या परंपरंचे पालन करणारया संप्रदायाला नारदीय संप्रदाय म्हणून ओळखले गेले.
5) वारकरी संप्रदाय:-पंढरपूरात विठ्ठलाच्या वारीला नियमितपणे जाणारया आणि विविध संतांच्या अभंगांवर मनापासून प्रेम करणारया संप्रदायाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात.

 

विषयप्रवेष

 संगीत आणि समाज या दोहोंमध्ये असलेल्या आंतरिक संबंधामुळे संगीत मानवाच्या सहज प्रवृत्तींच्या रूपाने भारतीय संस्कृतिचे अभिन्न अंग बनले आहे. प्रत्येक समाजाची आणि राष्ट्राची यशस्विता ही त्या त्या समाजाच्या सांस्कृतिक सभ्यतेवर अवलंबून असते. संगीताच्या अभ्यासाबरोबरच व्यक्ती स्वतःचा विकासही साधतो आणि कलेच्या माध्यमातून आपले जीवन आधिक सृजनशील आणि सुसंस्कारित बनवितो| संगीत हे भावनांच्या अभिव्यक्तिचे सशक्त माध्यम आहे. प्राचीन वेद आणि पुराणांमध्ये आपल्याला संगीताचे संदर्भ प्राप्त हेातात. प्रचलित चार वेदांमध्ये सामवेद हा संपूर्णतः संगीतमय वेद आहे. मुळात संगीताची उत्पत्तीच धार्मिक प्रेरणेतून झाली आहे. ईश्वरपूजा, ध्यान, जप, तप या सर्वांपेक्षाही गानसेवा आहे. भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये कीर्तन परंपरेचे अस्तित्व दिसून येत. मात्र प्रत्येक प्रांताची कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणाची पध्दत निराळी आहे. कर्नाटक, उत्तर भारत आदि ठिकाणच्या भक्तिसंप्रदायांची कीर्तने ही संगीत प्रधान असतात तर महाराष्ट्र आणि बंगाल च्या कीर्तनांमध्ये कथा, उपदेश, आणि संगीताचे महत्तव अधिक असते. गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल इ. प्रदेशांत फक्त रामलीला, कृष्णलीला गातात. पूर्वरंग नसतो. कर्नाटक आणि आंध्रात महाराष्ट्राप्रमाणेच हरिदासी कीर्तन केले जाते. या प्रत्येक प्रांतांमध्ये अनेक थोर कीर्तनकार होवून गेले, जसे कर्नाटकात पुरंदरदास, उत्तर भारतात कबीर, तुलसीदास, गुजरातमध्ये नरसी मेहता, बंगालमध्ये श्री चैतन्य महाप्रभु इ.

वेदांत शास्त्रामध्ये प्रत्येक कार्याची दोन फळे सांगितली आहेत| अतिरिक्त फळ आणि मुख्य फळ. कीर्तनाचीही अशीच दोन प्रयोजने मानली गेली आहेत. मूळ पारमार्थिक बैठक असलेल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजात धर्मभावना, भक्तिभाव जागृत करणे आणि संस्कृतीचे रक्षण करणे हा सर्वच प्रांतांमधील कीर्तनाचा प्रमुख उद्देश्श आहे. त्याचबरोबर समाजप्रबोधन आणि मनोरंजन ही देखील कीर्तनाची अतिरिक्त प्रयोजने आहेत.

   महाराष्ट्र ही भागवतधर्माची ध्वजा फडकविणारया संतांची भूमि आहे. कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे. तेराव्या शतकात महानुभाव आणि वारकरी संप्रदायांमध्ये मराठीमध्ये साहित्यनिर्मिती झाली| संतवाङ्मयामध्येही कीर्तनाचा उल्लेख प्राप्त होतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाच्या श्लोकांवर केलेल्या भाष्याने कीर्तनाचे महत्व सिध्द होते. नारद आणि शुक हे दोघेही प्राचीन काळापासून कीर्तनकार म्हणून प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार म्हणून प्रसिध्दी पावलेल्या संत नामदेवांनी परमेश्वराचे नाम, चिंतन आणि स्मरण या त्रिपुटीच्या माध्यमातून कीर्तनास लोकप्रिय केले. कीर्तनात नामस्मरण, श्रवण, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन इ. चा सुरेख समन्वय आढळतो. अशाप्रकारे कीर्तनभक्तिद्वारे महापापांच्या राशींचेही निर्मूलन होते असे पुराणांमध्ये वर्णन आढळते. भक्ति म्हणजे भक्ताला त्याच्या आराध्यापर्यंत पोहचविणारी उत्कट प्रेममय अवस्था, आणि कीर्तन म्हणजे संगीत आणि हरिकथेच्या माध्यमातून त्याला मिळणारी अनुभती होय.

कीर्तनाचा उगम आणि स्वरूप

    कीर्तन या शब्दाची उत्पत्ती कीर्त धातूपासून झाली. याचा अर्थ, उल्लेख करणे, सांगणे, आवाहन करणे, पठन करणे, पुनरावृत्ति करणे अथवा प्रशंसा करणे असा होतो. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये देवतांची स्तुति, आवाहन, त्यांना आपल्या विविध कामनांच्या पूर्तीसाठी याचना करणे आदि प्रयोजने संगितली आहेत. पौराणिक काळात भक्तिला मोक्षमार्गाच्या रूपात महत्व होते. भगवत्गीतेमध्ये श्रीकृष्णाने कीर्तन आणि भक्ति ला ईश्वर आणि मोक्षप्राप्तीचा सर्वाधिक सोपा उपाय म्हणून वर्णिले आहे. नारद मुनींनी महर्षी व्यासांना, आणि व्यासांनी शुकमुनींना ही कला शिकविली आणि पुढे तिचा सर्वदूर प्रचार झाला असेही उल्लेख आपल्याला प्राप्त होतात. गुरूपुराणात आत्मज्ञानाद्वारे परमपद प्राप्त करण्यासाठी कीर्तनाचा मार्ग सांगितला आहे| कोणताही भेदभाव न ठेवता सर्व स्तरांमधील लोकांना अंतिम पुरूषार्थाप्रत नेणारा मार्ग म्हणजे कीर्तन असे म्हटले गेले आहे. असे म्हणतात की वैदिक परंपरेत सांगितलेल्या मोक्षमार्गांना भक्ति आंदोलनाच्या काळात सोप्या पध्दतीने कीर्तनाच्या रूपात प्रस्तुत केले गेले. विविध धर्मग्रथांमध्ये कीर्तनाचे उल्लेख पुढीलप्रकारे सांगितले आहेत.

 श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं, पादसेवनम्।
     अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।
                                         भागवत् पुराण एकादश स्कंध ।
कलेर्दोषनिधे राजन्नस्ती हयोको महान्गुणः।
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगःपरं व्रजेत।। 
                                                    भागवत पुराण (12‐3‐51)
लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात्।
                                  नारद भक्तिसूत्र (3‐37)

    कीर्तन म्हणजे कला की अनुष्ठान यावर अनेक मत मतांतरे आढळतात‐ कीर्तन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्यामुळे धर्म, तत्वज्ञान, नीती आणि कला या संस्कृतीच्या चारही अंगांचे दर्शन कीर्तनात होते‐ कीर्तन ही एक अष्टपैलू कला आहे. यात सादरीकरणाला विशेष महत्व आहे. संपूर्ण कीर्तनात संगीताचा भाग केवळ तीस टक्के असतो‐ याचबरोबर अभ्यास, नाटय, अभिनय, आत्मविश्वास आणि वक्तृत्व यांचेही महत्वाचे स्थान कीर्तनात मानल्या गेले आहे. असे असले तरी कीर्तनास पूर्णपणे कला समजणे अयोग्यच मानले जाईल कारण एकदा का कीर्तनाला कलेच्या कक्षेत बसविले की मग केवळ मनोरंजन आणि अर्थार्जन या दोन उट्ठेश्शप्राप्तीसाठीच कीर्तनाचे प्रयोजन राहील आणि केवळ त्याच दृष्टीकोणातून इतरही अनेक बाबींचा यात समावेश केला जाईल. कलेमध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणारया नवरसांचा परिपोष कीर्तनात करताना शांत अथवा भक्तिरसाखेरीज अन्य सर्वच रस महत्वाचे ठरतील| आणि कीर्तनाच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष होईल. कीर्तनाला अशाप्रकारे करमणुकीचा विषय समजण्याचे कारण म्हणजे हा विषय सगळयांना इतका सोपा वाटतो की आजकाल जो उठतो तो कीर्तन करायला लागला आहे| एखादया अभ्यासू आणि विद्वान कीर्तनकाराप्रमाणे कीर्तनाचा पूर्वरंग आणि उत्तररंग सर्वांगसुंदर करण्यासाठी आवश्यक असणारया वैचारिक साधनसामुग्रीच्या संकलनाकडे सामान्य कीर्तनकारांचे दुर्लक्ष होत चालले आहे. केवळ उदरभरणासाठी कीर्तन करणारा कीर्तनकार हा आपल्या कीर्तनात सामान्य आख्यानांच्या जोरावर श्रोत्यांना खुष करण्याचा प्रयत्न करतो असे स्पष्ट मत ह‐भ‐प‐ नानाबुवा बडोदकर यांनी 1963 मध्ये मुंबई येथे झालेल्या नारदीय हरिकीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण करताना व्यक्त केले आहे.

 

कीर्तनाची विषयवस्तु

कीर्तनात संतपुरूषांची चरित्रे, पद, अभंग, ओवी, श्लोक, पंतकवींच्या आर्या, कटाव, फटके इत्यादि आणि लोकसंगीतातील भारूड, अंजनीगीते, गवळण, आदि पद्य प्रकारांचा उचित प्रयोग केलेला असतो. ज्या संप्रदायाचे कीर्तन असेल त्या संप्रदायातील परिपाठापमाणे संत महंतांनी निर्मिलेले साहित्य आणि वाङमय कीर्तनाचे वेळी उपयोगात आणले जाते. मुळात कीर्तन हे समाजप्रबोधनाचे माध्यम असल्याने त्या विषयांना साजेशा साहित्याचा भरणा कीर्तनात असतो. याशिवाय रामायण, महाभारत, अष्टादश पुराणे, फुटश्लोक, आरत्या, लळित, गांधळ, पद, सुभाषिते, भूपाळया, नकला, गप्पा, चुटके, विविध सामाजिक प्रसंगानुरूप भाष्य यांचाही कीर्तनात सुयोग्य प्रयोग केलेला असतो‐ वरील सर्व साहित्याच्या मदतीने कीर्तनकार आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमध्ये कीर्तन करतो त्यावेळी श्रोत्यांचे देहभान हरपते.

 

कीर्तनकाराचे गुण

विद्यावाचस्पति पं‐ शंकर अभ्यंकरजींच्या मते कीर्तनात काव्यवाद्यवादननर्तननाटयगायनतत्वज्ञानपाठांतरवक्तृत्वविविध भाषांचे ज्ञानविनय आणि शिष्ठाचाराचे ज्ञान या दशकलांचा समावेशहोतो या गुणांनी युक्त स्वानुभवसंपन्न व्यक्तिलाच कीर्तनकार म्हटले गेले पाहिजे. कीर्तन हा एकपात्री प्रयोगआहे  असे जरी मानले तरी श्रोत्यांच्या सहभागाशिवाय हे प्रस्तुतीकरण अपूर्णच आहे. कीर्तनाची व्याख्याकरतानाच आपण सांगतो की ज्यावळे भगवंताची भक्ति ही साहित्य आणि संगीत या दोनही माध्यमांच्याएकत्रित प्रयोगाने केली जाते त्यावेळी त्याला कीर्तन असे म्हणतात. म्हणजेच एक चांगला कीर्तनकार हा एकउत्तम अभिनेता आणि गायक असणे आवश्यक आहे. सुमारे दोन ते तीन तास श्रोत्यांना आपल्या अभिनयआणि वक्तृत्व कलेद्वारे खिळवून ठेवण्यासाठी ताकद त्याच्यामध्ये असावी‐ त्याचे पाठांतर चांगले हवे.  त्यालाविनोदाचेही अंग हवे नाहीतर कीर्तनाला उगाचच गंभीर स्वरूप प्राप्त होईल. योग्य ठिकाणी खुमासदारशैलीतून विनोद पेरल्याने कीर्तनातील साचेबंदपणा नाहीसा होतो. कीर्तन हे हरिभक्तीचे माध्यम असल्यानेकीर्तनातील विविध पदांना लावलेल्या चाली सात्विक असाव्यात. कीर्तनकाराला एकच पद वेगवेगळया वेळीवेगवेगळया चालीत बांधता आले पाहिजे. कीर्तनकाराजवळ आधारवचनेकिस्सेआणि कोटयंाचा भरपूरसंचय असावा. स्वतः कीर्तनकार  सदाचारसंपन्नविद्वानस्वधर्माविषयी अभिमान बाळगणारा असावाजेणेकरून तो आपल्या कीर्तनातून समाजाला प्रबोधित करू शकेल. कीर्तनामध्ये अनेक प्रसंगी संस्कृत श्लोकसांगावे लागत असल्याकारणाने कीर्तनकाराचा संस्कृतचा अभ्यास दांडगा हवा‐ उच्चारण स्पष्ट हवे‐ आधुनिकयुगातील घडामोडींविषयी वक्तव्य करताना आजच्याच प्रचलित भाषेतील अर्थातच इंग्रजी भाषेतील विविधघडामोडींची माहिती पण कीर्तनकाराने ठेवणे आवश्यक आहे आणि यासाठी त्याचे इंग्रजी भाषेवरही मराठीइतकेच प्रभुत्व असावे. एकूणच काय ज्याप्रमाणे एखादी नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार आधी त्यासंबंधीचीसंपूर्ण माहिती मिळवून पूर्वतयारी करतो त्याचप्रमाणे कीर्तनालाही फावल्या वेळेतील उद्योग  समजता एकपूर्णवेळ व्यवसाय म्हणूनच स्विकारावे आणि त्यासाठी आवश्यक असणारया गोष्टींचा पूर्वाभ्यास करावा.

 

कीर्तनाचे प्रकार

महाराष्ट्रात प्रामुख्याने कीर्तनाच्या दोन पध्दती अस्तित्वात आहेत.

 
1) वारकरी कीर्तन:-
     अनेक शतकांपासून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात आहे. पुढे हा प्रघात वाढत गेला आणि अखेरीस त्यास वारी करणारे ते वारकरी अशाप्रकारे वारकरी संप्रदाय असे नाव प्राप्त झाले.  हा भक्तिमार्गप्रधान वैष्णव संप्रदाय आहे. या संप्रदायात मराठी समाजातील सर्वच थरातील लोकांचा समावेश आहे. अगदी वैदिक संप्रदायामध्ये ज्यांना यज्ञयाग करणे निशिध्द मानले जाई त्या स्त्री आणि शूद्रांचाही या संप्रदायात समावेश होतो. अशाप्रकारे अत्यंत लोकप्रिय असा हा संप्रदाय आहे‐ ज्ञानेश्वर माऊली हे या संप्रदायाचे जणूकाही दैवत आहे. विठ्ठलभक्ति, ज्ञानेश्व,र, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, सेना न्हावी, रोहिदास, चोखामेळा, सावतामाळी तुकाराम, निळोबा आणि इतर संतांच्या अभंगांचा वारकरी कीर्तनात समावेश होतो‐ या कीर्तनाचे प्रवर्तक संत नामदेव आहेत‐ वारकरी कीर्तन कोणत्याही जातीच्या पुरूषांद्वारे केले जाते. वारकरी कीर्तनात श्रोतेही कीर्तनकाराला अधुनमधून गायन संगत करतात. एकूणच हया कीर्तनाचे स्वरूप सामूहिक आहे‐ प्रत्येक संप्रदाय हा ईश्वरभक्ती आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने प्रेरित असतो. संप्रदाय एखादया विशिष्ट तत्वज्ञानाचे पालन करीत असतो, ज्याआधारे कीर्तनकार ऐहिक आणि पारमार्थिक ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन करतो. या प्रत्येक संप्रदायांची संतपरंपरा, मंत्र, उपास्य दैवत, कीर्तनाचे स्वरूप, आणि कीर्तनकारांची वेशभूषा वेगळी असते. पंढरी-आळंदीची वारी, नित्य हरिपाठ पठण, तुळसीमाळ धारण करणे, गोपीचंदनाची मुद्रा आणि संप्रदायाचा एकसू़त्रीपणा या नियमांचे पालन वारकरी संप्रदायात करावेच लागते‐ वारकरी कीर्तनात आपल्याला मौखिक परंपरा प्रचलित असलेली दिसून येते. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग वारकरी कीर्तनात निरूपणासाठी घेतले जातात. वारकरी कीर्तनातही नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असे भाग असतात, मात्र याच्या उत्तररंगात आख्यानाचा समावेश होत नसून संतांच्या अभंगांवरच निरूपण केले जाते. वारकरी कीर्तन हे मंदिरातच केले जावे असे बंधन नसल्याने जिथे जिथे श्रोते जमू शकतील अशा कोठेही वारकरी कीर्तन रंगू शकते. पूर्वी नदीच्या वाळवंटात वारकरी कीर्तने होत असत‐ या कीर्तनात वीणेला अत्यंत महत्व आहे आणि संपूर्ण कीर्तन हे वीणेच्या साथीने आणि साक्षीने होते.

2) नारदीय अथवा हरिदासी कीर्तन

देवर्षी नारदांना या कीर्तनाचे प्रवर्तक मानले आहे. त्यांच्यापासूनच ही परंपरा आजतागायत पुढे चालू आहे. नारदीय कीर्तन हे मंदिरांतच केले जावे असा नियम आहे. मात्र आता बदलत्या काळानुसार हे कीर्तन मोठया मैदानात अथवा बंदिस्त सभागृहातही केले जाते. नारदीय कीर्तनकार आपल्या कीर्तनात विठ्ठलाच्या गुणगानाबरोबरच अन्य पौराणिक देवी देवतांच्या आख्यानाचाही समावेश करतात. याच्या प्रस्तुतीकारणाचा क्रमही नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असाच आहे. पूर्वी नारदीय कीर्तन केवळ ब्राह्मण स्त्री अथवा पुरूषांद्वारे केले जात असे‐ आता मात्र असे काही बंधन दिसून येत नाही.  पूर्वरंगात कीर्तनकार एखादया प्रसिध्द पदाने कीर्तनाची सुरूवात करतात आणि उत्तररंगात एखादया पौराणिक अथवा अन्य कथेवर निरूपण करतात. यात वारकरी कीर्तनाप्रमाणे गायनसंगतिसाठी श्रोत्यांचा सहभाग नसतो कारण नारदीय कीर्तनकार आपल्या कीर्तनात विविध सांगितिक अलंकरणांचा उपयोग आपल्या गानकौशल्याद्वारे करीत असतो. 

   ढोबळ मानाने कीर्तनाचे वारकरी आणि नारदीय असे जरी दोनच प्रकार असले तरी नारदीय कीर्तन पध्दतीत आणखी काही उपप्रकार पहावयास मिळतात. यात साधारणपणे कीर्तन करण्याची पध्दत सारखी असली, तरी कीर्तनात समाविष्ट केलेल्या विषयांवरून हे प्रकार वेगळे होतात. हे विविध प्रकार म्हणजे रामदासी कीर्तन, दत्त संप्रदायिक कीतन, राष्ट्रीय कीर्तन, गाडगेबाबांचे सामाजिक कीर्तन, सरकारी कीर्तन, काॅर्पोरेट कीर्तन इ. वरील सर्व कीर्तनप्रकार आज महाराष्ट्रात प्रचलित आहेत.

3) राष्ट्रीय कीर्तन:-
     या कीर्तनप्रकाराचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनी केला. राष्ट्रीय कीर्तनात पौराणिक कथांच्या माध्यमातून देशभक्ति चा विचार मांडला जातो. याच्या उत्तररंगात निरनिराळया देशभक्तांची, राष्ट्रपुरूष, स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक आणि क्र्रातीकारकांची चरित्रे आणि कथा, पोवाडे आदींच्या माध्यमातून प्रस्तुत केली जातात. लोकमान्य टिळकांनी स्वतंत्रता आंदोलनाचे वेळी जनजागृतीचे साधन म्हणून कीर्तनाचा उपयोग केला. ब्रिटिश सत्ताधारयांचे दोष लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारतातील कथांचा उपयोग मोठया खुबीने केला. या कीर्तनात रामायण महाभारतातील उदाहरणांचा उपयोग करून आधुनिक समाजातील राजकीय महत्व असलेल्या ज्वलंत विषयांवर भाष्य केले जाते.
 

4) सामाजिक कीर्तन:- 
     सामाजिक कीर्तनामध्ये समाजात प्रचलित अनिष्ट रूढींचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. कीर्तनाच्या या प्रकाराचा पुरस्कार विदर्भातील संत गाडगेबाबा आणि त्यांच्या अनुयायांद्वारे केला गेला. गाडगेबाबा हे एक थोर संत आणि कर्मयोगी होवून गेले‐ स्वतःच्या कृतीतून ते समाजाला जनता जनार्दनाच्या सेवेचा धडा घालून देत‐ गाडगेमहाराजांनी सुरू केलल्या या नामसंकीर्तनाचा मुख्य हेतू समाजप्रबोधन हाच असून रस्त्यावर कोठेही उभे राहून त्यांचे कीर्तन होत असे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, गोापाला गोपाला, रामकृष्ण गोविंद नारायण, विठ्ठल विठ्ठल गाऊं मै धूम मचाऊँ इ. त्यांची आवडती पदे होती. परोपकाराचे पुण्य पदरी घ्या. परपीडा देऊ नका, यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे, देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रूपान उभा आहे, त्याचीच प्रेमाने सेवा करा हाच संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला.

 

 आज जरी हा कीर्तनप्रकार नामशेष झाला असला, तरी सामाजिक कीर्तनाअंतर्गत विविध सामाजिक प्रश्नंवर नारदीय कीर्तनकार आज उत्तम प्रकारे कीर्तन करताना आढळतात.

5) दत्त सांप्रदायिक कीर्तन:- 
     श्री दत्तांची उपासना महाराष्ट्रात महानुभाव पंथाद्वारे प्रवर्तित झाली आणि याचे प्रवर्तक श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंहसरस्वती, ज्यांना दत्ताचे अवतार मानले गेले, त्यांच्या संप्रदायाद्वारे हा संप्रदाय समाजात लोकप्रिय झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हा संप्रदाय विशेष लोकप्रिय आहे‐ याचे उपास्य दैवत श्री दत्तात्रेय आहे. हा संप्रदाय प्रवृत्तिपर, सगुणोपासना, औदुंबरोपासना, दत्तभक्ति यांवर भर देणारा आहे. या संप्रदायातील कीर्तनाचे विशेष म्हणजे यातील बहुतांश कीर्तनकार आपल्या कीर्तनात गुरूचरित्र, दत्तप्रबोध, गुरूलीलामृत, दत्तमहात्म्य आदि दत्तभक्तिविषयक साहित्याचाच समावेश करतात‐ कीर्तनाचे प्रारूप मात्र नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असेच असते.

6) रामदासी कीर्तन:- 
     समर्थ संप्रदायाच्या कीर्तनकारांद्वारे केल्या जाणारया कीर्तनाला रामदासी कीर्तन असे म्हणतात. समर्थ संप्रदाय हा देखील परमार्थिक संप्रदाय आहे‐ राम, मारूती ही या संप्रदायाची प्रमुख दैवते असून बलोपासना आणि संघटना यांवर विशेष भर दिला जातो. समर्थ रामदासांद्वारे लिहिलेल्या वाङमयाचा या संप्रदायात अभ्यास केला जातो. रामदासी कीर्तन याच साहित्यावर आधारित असते. त्यांचे विषय राजकरण, दासबोध, मनाचे श्लोक, रामायणातील कथा, श्री मनाचे श्लोक, करूणाष्टके, रामोपासना, रामभक्ति, पूजा आणि समाजातील परिस्थितीची जाणीव श्रोत्यांना करून देणे हेच आहेत. रामदासी कीर्तन हे तामिळनाडूतील तंजावर येथे अधिक प्रचलित आणि लेाकप्रिय आहे. आजही या परंपरेचे तेथील रामदासी मठांद्वारे जाणीवपूर्वक जतन केले जात आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे  समर्थ संप्रदायाचे सर्वच कीर्तनकार आपल्या नावापुढे रामदासी हे बिरूद लावतात.
 

7) जुगलबंदी कीर्तन:- 
    आधुनिक युगात लोकप्रिय झालेला हा नारदीय कीर्तनाचाच एक प्रकार आहे. यात विषयही नारदीय कीर्तनाप्रमाणेच असतात मात्र एका कीर्तनकाराऐवजी दोन कीर्तनकार मंचावर अथवा कीर्तनाच्या गादीवर उभ् असतात, आणि ते एकाच विषयाच्या दोन बाजू विविध दाखले देत श्रोत्यांना सांगतात. यात दुसरयाचे मत खेाडून काढतानाच आपले मत कसे योग्य आहे असे पटवून द्यायचा प्रयत्न असत. यासाठी सवाल जवाब किंवा प्रश्नोत्तरांचा उपयोग केला जातो. कीर्तनाचे शेवटी त्या विषयाचे तात्पर्य श्रोत्यांसमोर मांडतात. जुगलबंदी स्वरूपात असल्याने समाजप्रबोधनाबरोबरच मनोरंजनाची बाजूही यात उत्तम रीतीने सांभाळली जाते.
 8) सरकारी कीर्तन:-
     सरकारी कीर्तनात शासनाच्या विविध योजनांचा प्रचार केला जातो. कोणतीही गोष्ट जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. कीर्तनाचे वेळी समाजातील सर्वच स्तरांतील लोक एकत्र येतात आणि म्हणूनच शासनाच्या विविध योजना लोकप्रिय करण्यासाठीच सरकारी कीर्तनाचे आयोजन असते. एका अशाप्रकारे कीर्तन हे लोकजागृति आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम आहे. 
9) काॅर्पोरेट कीर्तन:-
     पारंपारिक कीर्तन प्रकारांबरोबरच आधुनिक काळात लोकप्रिय झालेला हा एक अत्यंत मनोरंजक कीर्तनप्रकार आहे. खरे पाहता सरकारी कीर्तन अथवा सामाजिक कीर्तन हे देखील अशाच प्रकारचे कीर्तन प्रकार आहेत. समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङमयात राजकरणासंबंधी केलेले भाष्यही साधारण याच स्वरूपाचे होते त्यामुळे ही कल्पना याच प्रेरणेतून घेतली असावी असे वाटते. या कीर्तनात काॅर्पोरेट जगात अथवा व्यावहारिक जगामध्ये काम करताना येणारया अडचणीेंवर आणि ताणतणावावर मात कशी करायची, यश अपयश आणि आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यातून कसा मार्ग काढायचा याची शिकवण आधुनिक युवा पीढीला त्यांच्याच भाषेत करून दिली जाते. कीर्तन या भक्तिजन्यकलाप्रकाराकडे आधुनिक पीढीला आकर्षित करण्याचे काम काॅर्पोरेट कीर्तनाद्वारे चांगल्या प्रकारे साधल्या जात आहे. युवा पीढीला येणारया अडचणींतून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही एक अध्यात्मिक प्रशिक्षण पध्दती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

कीर्तनाची अंगे

     हरिदासी कीर्तनाच्या सर्वच प्रकारांमध्ये ढोबळमानाने नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असा क्रम आढळतो. मात्र सांप्रदायिक विशेषांनुसार नमनाचे श्लोक आणि पदे बदलतात. नमन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कार्यसिध्दीस नेण्यास देवी देवतांना आवाहन करणे होय. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरूवात ही ईशस्तवनाने अथवा पूजनाने करतो. कीर्तनात ते नमनाद्वारे केले जाते. कोणत्याही कीर्तनात नमनाचा भाग हा अपरिहार्यच असतो. त्यामुळे प्रत्येक संप्रदायात नमनाची पदेही ठरलेली असतात‐ इतकेच काय पण त्या पदांचे राग आणि तालही निश्चित असतात. यातून सांप्रदायिक शिस्त दिसून येते. यात सांप्रदायिक श्लोकही गायले जातात‐ या श्लोकांचा क्रम गणपती, सरस्वती, कुलदेवता, विष्णू, कृष्ण किंवा पांडुरंग स्तवन, ज्या देवतेपुढे कीर्तन आहे त्या देवतेचे स्तवन आणि गुरूस्तवन अशाप्रकारे घेतात. हरिदासी कीर्तनाअंतर्गत येणारया एकनाथी, रामदासी आणि राष्ट्रीय कीर्तनामध्ये थोडयाफार फरकाने हीच शिस्त पाळलेली दिसते. नमन हे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे करावे अशी परंपरा आहे. कीर्तनकार बुवा जर संगीत कलेत प्रशिक्षित असतील, तर नमनाचा कालावधी अध्र्या तासंचाही होतो. मात्र एकूणच कीर्तनाच्या रूपबंधाचा विचार करता अध्र्या तासापेक्षा जास्त नमनाचा कालावधी असू नये हे नक्की. कीर्तनकाराचे नमन कसे होते यावर पुढील कीर्तन रंगणार की नाही याचा श्रोत्यांना अंदाज येतो.

     नमनानंतरचा भाग पूर्वरंगाचा असतो‐ हा कीर्तनाचा मुख्य भाग आहे‐ साधारणपणे याचा कालावधी एक तास एवढा असतो. पूर्वरंगातच कीर्तनकाराचे गानकौशल्य पणाला लागते‐ कीर्तनाच्या मूळ विषयाचे प्रतिपादन कीर्तनकार पूर्वरंगात करतो. अशावेळी निरूपणासाठी कोणता विषय घ्यावा हे कीर्तनकारच ठरवितो‐ हे ठरवितांना त्याला स्वतःच्या मर्यादा, श्रोत्यांची आवड, कीर्तनाचा प्रसंग इ. चे भान ठेवणे आवश्यक असते. निरूपणासाठी निवडलेल्या विषयाची उकल करताना कीर्तनकार विविध सिध्दांत आणि संतवचन तसेच शास्त्रवचनांचे आधार देतो. यातच काही दृष्टांतांचाही समावेश करतो आणि गोष्टीच्या अनुषंगाने विनोद, कोटया आणि संगीताची पेरणी करून पूर्वरंग रंगवितो. अधून मधून नामघोष करून श्रोत्यांनाही कीर्तनात सामिल करून घेतो‐ या निरूपणाचे रूप मनोरंजनाबरोबरच उपदेशात्मकही असते‐ पूर्वरंगात निरूपणासाठी घेतलेल्या विषयाचा कीर्तनकाराचा अभ्यास आणि पाठांतर पक्के असावे. निरूपणाचा विषय, त्यात येणारे मुट्ठे, त्यांचा क्र्रम, पद्ये इ. सह पूर्वरंग बसविलेला असावा जेणेकरून पूर्वरंग आकर्षक होईल.
     पूर्वरंगानंतर काही वेळ भगवंताचा नामजप केला जातो आणि श्रोत्यांमधील एखादया भक्ताद्वारे भक्तिगीत अथवा पदगायन केले जाते. नामजप आणि संगीताने कीर्तनाच्या पूर्वरंगात कीर्तनकाराने निर्माण केलेले भक्तिमय वातावरण आणखी प्रभावी होते त्याचबरोबर कीर्तनकाराला पण थोडा वेळ विश्रांती मिळते. यानंतर कीर्तनकार उत्तररंगाची सुरूवात एखादया आख्यानाने करतात. प्राचीन कवी आणि संतांच्या साहित्याचा आख्यानात उपयोग केला जातो. त्याच बरोबर साकी, दींडी आर्या, लावणी, कटाव इ. चा मुक्त उपयोग उत्तररंग रंगविण्यासाठी केला जातो. पूर्वरंगात घेतलेल्या विषयाच्या अनुषंगाने काही मुट्ठे प्रसंगवर्णन आणि आख्यानांच्या रूपात उत्तररंगात सांगितले जातात. आख्यान रंगविण्यासाठी कथानकाची निवड ही अत्यंत योजनापूर्वक करणे आवश्यक असते. त्यामुळे एखादे मोठे कथानक घेण्यापेक्षा लहान पण रोचक प्रसंग घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरते. विविध रसांची निर्मिती करण्यासाठी त्यात वेगळी स्थळे, वर्णनप्रसंगे, वेगवेगळया स्वभावाची पात्रे असावीत‐ त्यामुळे रसविर्भाव होण्यास सोपे होते व रंग भरता येतो.  आख्यानातील संगीत, वक्तृत्व आणि अभिनयामुळे आख्यान रंगते. आख्यानातील विविध प्रसंगांना उचित अशा काव्याचाही उपयोग त्या ठिकाणी कीर्तनकारास करता येतेा.  बरयाच वेळेला कीर्तनकार आख्यान कोणते लावणार यावर कीर्तनातील श्रोत्यंाची उपस्थिती अवलंबून असते. अधूनमधून देवतांची भजने आणि नंतर त्यांचा जयजयकार केला जातो. उत्तररंगानंतर आरतीने कीर्तनाची समाप्ती होते.

 

साथसंगत
     वारकरी कीर्तनात संगतीसाठी एक मृदुंग आणि दहा ते पंधरा टाळ वादक असतात, तर नारदीय कीर्तनात झांज, तबला आणि हार्मोनियम ची संगत असते. पेटीवादक बुवांच्या डाव्या बाजूला तर तबला अथवा पखावज वादक उजव्या बाजूला बसतो. नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे नमनापर्यंत कीर्तनकार स्वतः तंबोरी किंवा छोटा तंबोरा घेऊन उभे राहतो आणि नमनानंतर ती तंबोरी दुसरया व्यक्तिस दिली जाते, जो पुढे संपूर्ण कीर्तन संपेपर्यंत तिचे अखंड वादन करतो. मात्र आधुनिक काळात ही पध्दत बंद होत चालली आहे‐ त्याऐवजी कीर्तनकार इलेक्ªटाॅनिक तंबोरयाचा उपयोग करताना दिसतात. मात्र वारकरी कीर्तनात कीर्तनाबरोबर वीणेची अखंड साथ असते‐ साधारणपणे कीर्तनकाराला संगत करणारी मंडळी ही त्यांच्या घरातीलच असत आणि परंपरेने संगत करण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळे कीर्तन सादर होताना कुठे कशाप्रकारे संगत करायची याचा योग्य अंदाज त्यांना होता ‐ आधुनिक काळात संगतकार हे व्यावसायिक असल्यामुळे ते जास्तीत जास्त उठावदार कसे हेाईल याची पूर्ण काळजी कीर्तनकार घेतात. तबला संगतकाराबरोबरच पेटी अथवा आॅर्गन संगतकाराचा कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणात महत्वाचा वाटा आहे. कीर्तनकाराला आवाजाला भरणा देणारे वाद्य असल्यामुळे पेटी वादकाला अनेकवेळा एकल वादनाची संधी प्राप्त होते. म्हणून पेटीवादक हा चांगला तयार असणे आवश्यक आहे‐ शक्यतो बुवांच्या सरावातील संगतकार असले तर त्यांना कीर्तनातील सर्वसामान्य आणि मूळपद्ये पाठ असतात आणि त्याबरहुकूम ते वादन करून कीर्तनात रंग भरू शकतात.

सामाजिक परिवर्तनांबरोबरच कीर्तनांच्या विषयांमध्येही परिवर्तन झालेले आढळून येते. विशेषतः खेडेगावांमध्ये जिथे मनोरंजनाची अन्य साधने उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी कीर्तन लहानांपासून ते अगदी म्हातारया लोकांपर्यंत सगळयांचेच मनोरंजनाचे साधन ठरते. कीर्तनकार आपल्या कीर्तनातून विविध सामाजिक विषयांवरील परिस्थिती आणि प्रश्नांना हात घालतो. अशाप्रकारे एका संवेदनशील नागरिकाच्या निर्मितीमध्ये कीर्तन आणि कीर्तनकारांचे मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपरयांतील खेडेगावांमध्ये उत्सव, धार्मिक पूजापाठ, सण समारंभ आदि विविध प्रसंगी कीर्तनाचे आयोजन केले जाते. कीर्तनाला धार्मिक अनुष्ठानाच्या रूपात मान्यता प्राप्त झाली आहे. 

बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार कीर्तनाच्या पारंपारिक रूपातही आवश्यक असणारया बदलांविषयीचे मनोगत नागपूर येथा झालेल्या पहिल्या कीर्तन संमेलतील अध्यक्षीय भाषणात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अशाप्रकारे व्यक्त केले. “बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार शिक्षणाच्या पध्दतींप्रमाणे लोकही बदलले. जिथे समाजच परिवर्तित झाला आहे, तिथे अशा समाजाच्या पुढे कीर्तनही पारंपािरक रूपात प्रस्तुत करणे योग्य नाही. आधुनिक समाजातील श्रोत्यांना पाश्चात्य राहणीमानाची सवय झाल्यामुळे या नवीन संस्कृतिच्या आधारेच कीर्तनकाराने श्रोत्यांवर आपली छाप पाडली पाहिजे. समाजप्रबोधन हा कीर्तनकाराचा मुख्य हेतु असल्याकारणाने कीर्तनकाराने बदलत्या काळाप्रमाणे आपल्या कर्तव्याची पूर्ती करणे आवश्यक आहे.” 
 

निष्कर्ष

कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील संतमंडळींनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमनात भक्तिभावाची पेरणी केली. कीर्तनातील पुराणकथांद्वारे जीवनमूल्यांच्या प्रचार केला. संतपरंपरेमुळेच कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील विचारधारेला जिवंत ठेवणे शक्य झाले. वर्तमान परिस्थितीत वाढत जाणारया दुराचारापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी कीर्तन परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे. कीर्तनाद्वारेच समाजात धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणे साध्य होईल. समाजात वेगाने होणारया पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या पाश्र्वभूमीवर पाश्चात्य विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधून समाजाला कीर्तनाची गोडी लावणे हे आजच्या कीर्तनकारासमोर असलेले मोठे आव्हान आहे.

कीर्तनाला केवळ धार्मिक संस्कारांचा एक भाग न मानता सामाजिक संदर्भातून याचे महत्त्व वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. कीर्तनाचा संगीताशी जवळचा संबंध असल्याकारणाने संगीताची आवड असणारया होतकरू विद्याथ्र्यांना या भक्तिविधेकडे वळविणे आवश्यक आहे. कीर्तनातूनही रोजगार प्राप्तीच्या आकर्षक संधी उपलब्ध झाल्या तर कीर्तनाचे जतन आणि संवर्धन योग्य रीतीने होणे सहज शक्य होईल आणि या क्षेत्रात गुणात्मक बदलही होतील.

संदर्भसूची

1) गर्ग पं‐ लक्ष्मीनारायण, संगीत निबंधावली, संगीत कार्यालय हाथरस, 1964
2) उपाध्ये सुरेश, संपादक, कीर्तन सुगंध, अमृत महोत्सवी वर्ष विशेषांक, 2015
3) साठे, विनायक वासुदेव, साभिनय कीर्तने, साठे ग्रंथ प्रकाशन मंडळी, रत्नागिरी, प्रथमावृत्ती 
   2000
4) अपामार्जने, प्रा‐ नरहरी चिंतामणि, नारदीय संकीर्तन, अमेय आर्टस्, नागपूर, 1980
5) कोपरकर, ग‐ना‐, कीर्तनाची प्रयोगप्रक्रिया, कीर्तन महाविद्यालय प्रकाशन, पुणे, 1982
6) होनमाने, डाॅ‐ धनंजय, तंजावरची मराठी कीर्तन परंपरा, स्नेहवर्धन प्रकाशन, 2018
7) जोशी, प्रा‐ सु‐ का‐, कीर्तनरंग, कीर्तन संमेलने, अध्यक्षीय भाषणे, कीर्तन महाविद्यालय, पुणे, 1979, आ‐ 
   पहिली
8) संत, प्रा‐ वि‐द‐, श्री समर्थ रामदास व्यक्ति आणि वाङ्मय, प्र्रकाशक श्री‐ वि‐ रा‐पानसे, अखिल देशस्थ 
   ऋग्वेदी ब्राह्नण मध्यवर्ती मंडळ, माहिम मुंबई
9) सरदार, गं‐बा‐ मराठी संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती, पुणे, 1952

10) देशमुख अच्युतराव गुलाबराव, सामुदायिक प्रार्थना, श्री गाडगे प्रकाशन सामिती, मुंबई 14